सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या औपचारिक प्रारंभाचे प्रतीक असलेल्या ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे होणाऱ्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यापूर्वी सुरू असलेली सर्व पायाभूत सुविधा व विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित विभागांना दिले.नाशिक येथे झालेल्या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी), जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रामकुंड ते कुशावर्तपर्यंत कामांचा आढावाबैठकीत रामकाल पथ व रामकुंड परिसरातील रस्त्यांची कामे, त्र्यंबकेश्वरमधील पाणीपुरवठा योजना, कुशावर्त कुंड संवर्धन, दर्शन पथाची उभारणी, ध्वजस्तंभाशी संबंधित कामे तसेच गजानन महाराज संस्थान ते आंबेडकर चौक मार्गाच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून वाहतूक, पाणीपुरवठा, रस्ते आणि धार्मिक स्थळांशी संबंधित सुविधा वेळेत पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.“ध्वजारोहणावेळी एकही काम अपूर्ण राहू नये”आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कामांची गती वाढवून ती दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. विशेषतः ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळी कोणतेही काम अपूर्ण किंवा अर्धवट अवस्थेत राहता कामा नये, अशी सूचना त्यांनी केली.
ध्वजारोहण सोहळ्यास साधू-संत, महंत तसेच देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोहळ्यापूर्वी सर्व आवश्यक सुविधा पूर्णपणे कार्यान्वित असणे गरजेचे असल्याचे आयुक्त सिंह यांनी नमूद केले.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील विकासकामांना आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे.
