साक्ष न्यूज: सातपूर येथील सकाळ सर्कलवरील स्वागत कमानीस संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, ही तमाम आंबेडकरवादी बांधवांसह सातपूरकरांची अनेक दिवसांपासूनची रास्त आणि भावनिक मागणी होती. अखेर या मागणीला यश आले असून, सातपूरकरांच्या भावनेचा सन्मान करत स्वागत कमानीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय पूर्णत्वास आला आहे.
प्रभाग क्रमांक ११ मधील चारही नगरसेवकांनी या मागणीसाठी नाशिक महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने सातपूरकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही केवळ एका स्वागत कमानीला देण्यात आलेली नवी ओळख नसून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तसेच भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांना दिलेला सन्मान असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या निर्णयाचे सातपूर परिसरातील आंबेडकरवादी बांधवांसह सर्व समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत असून, सातपूरकरांच्या दीर्घकाळच्या भावनिक मागणीला न्याय मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
