शासन निर्णयात दुरुस्तीच्या मागणीसाठी इगतपुरीतील ग्रामरोजगार सेवकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मानधन व सेवा सुरक्षेबाबत २२ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात दुरुस्ती अथवा तो रद्द करण्याची मागणी इगतपुरी तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेने केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत राज्यव्यापी काम बंद आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका संघटनेने घेतली असून, याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये ३ ऑक्टोबर २०२४च्या शासन निर्णयानुसार थकीत असलेले दरमहा ८ हजार रुपयांचे निश्चित मानधन तातडीने देणे, ग्रामरोजगार सहाय्यकांना सेवा सुरक्षेची हमी देणे, विमा कवच लागू करणे आणि संपकाळात सेवा रुजू असल्याचे गृहीत धरणे यांचा समावेश आहे.

तसेच ग्रामरोजगार सहाय्यकांना सेवेतून कमी करण्याचा अधिकार ग्रामसभेऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्थानिक राजकीय गटबाजी, खोट्या तक्रारी, धमकी, शिवीगाळ व मारहाणीच्या घटनांमुळे ग्रामरोजगार सहाय्यकांना असुरक्षित वातावरणात काम करावे लागत असल्याचा दावा संघटनेने निवेदनात केला आहे.२२ सप्टेंबरच्या शासन निर्णयात आवश्यक दुरुस्ती होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा इगतपुरी तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »