तीन वर्षांपासून रस्ता अपूर्ण; आदिवासी पाड्याच्या विकासाला खीळ

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटकावरा ते हेंदपाडा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याचे काम सुरू करून ते अर्धवट सोडण्यात आल्याने नागरिकांना आजही खराब व खडतर मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.या रस्त्यामुळे परिसरातील आदिवासी पाड्यांना मुख्य रस्त्याशी जोडणी मिळणार होती. मात्र काम अपूर्ण राहिल्याने या भागातील नागरिकांना दळणवळणाच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेणेही कठीण होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

रस्त्याचे काम तीन वर्षांपासून पूर्ण झालेले नसतानाही संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित ठेकेदार पालघर जिल्ह्यातील असल्याने कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला आहे.अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करून प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी, कामाची गुणवत्ता तपासावी आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.रस्ता मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात किती काम झाले, किती निधी खर्च झाला, कामाची मुदत काय होती आणि काम अर्धवट का राहिले, याची माहिती संबंधित विभागाने नागरिकांसमोर स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून आदिवासी पाड्याला चांगला आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा. अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बुधाभाऊ ढोरे यांनी दिला आहे.आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन रस्त्याचे काम कधी सुरू करते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »