साक्ष न्यूज: उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महासमृद्धी योजना इगतपुरी तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, खंबाळे वाघोबा वाडी येथील आदिवासी कातकरी कुटुंबांना विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.कातकरी कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्यांचे राहणीमान उंचावणे, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शिक्षण, पिण्याचे पाणी आणि आरोग्य यांसारख्या समस्यांवर काम करण्यासाठी महासमृद्धी विभाग प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमात दिव्यांग, एकल, परित्यक्ता, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
ज्या कुटुंबांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्मान कार्ड, शेतकरी प्रमाणपत्र, बँक व विमा संबंधित कागदपत्रे उपलब्ध नाहीत, त्यांना समृद्ध सखींच्या सहकार्याने आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी मदत करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी जिल्हा व्यवस्थापक छत्रपती देवकर आणि सीसीबी गोरक्ष आव्हाड यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. समृद्ध सखी रेश्मा खाडे, राजश्री पदमेरे, वर्षा रोकडे, सोनाली गांवडा, वंदना घारे, ललिता क्षीरसागर, विधी उगले, ललिता लहाने, अर्चना लोटे, ग्रामसखी रुपाली चौधरी, अंगणवाडी मदतनीस विमल घायवट यांच्यासह स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महासमृद्धी योजनेच्या माध्यमातून आदिवासी कातकरी कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांशी जोडून त्यांना स्वावलंबी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याने स्थानिक महिलांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले
