त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी : हरीश तुपलोंढे):तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेझे गाव परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि बांधावरील माती वाहून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर तहसिलदार मा. जाधव साहेब यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
तहसिलदारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या पाहणीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ आनंदा तुपलोंढे, रामू बंडू चव्हाण, अशोक चव्हाण, पंडित तुपलोंढे, प्रभाकर चव्हाण, रामू तुपलोंढे, संजय तुपलोंढे आदी उपस्थित होते.
या वेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसिलदारांकडे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशर्तींशिवाय तत्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी ठाम मागणी केली. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात आले असून शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उपस्थितांनी केली आहे.
