नाशिक जिल्ह्यात मोफत डायलिसिस सेवा सुरू; चांदवड व सिन्नर येथे रुग्णालयात अत्याधुनिक केंद्र कार्यान्वित

बातमी शेअर करा

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक बातमी असून जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत डायलिसिस सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय चांदवड आणि ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन आणि एचएलएल (HLL) संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत 20 रुग्णांनी या केंद्राचा लाभ घेतला असून तब्बल 640 डायलिसिस सत्रे यशस्वीरीत्या पार पडली आहेत.ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे पाच वातानुकूलित बेडची व्यवस्था करण्यात आली असून तज्ज्ञ फिजिशियन, दोन डायलिसिस टेक्निशियन, एक स्टाफ नर्स आणि एक स्वच्छता कर्मचारी असा प्रशिक्षित सहा जणांचा कर्मचारीवर्ग उपलब्ध करण्यात आला आहे. रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवा देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.डायलिसिस म्हणजे शरीरातील रक्तामधील अतिरिक्त पाणी व विषारी द्रव्ये कृत्रिम पद्धतीने बाहेर टाकण्याची प्रक्रिया होय. मूत्रपिंडे निकामी झाल्यास ही प्रक्रिया मशीनच्या सहाय्याने करावी लागते.

किडनीचे कार्य 10 ते 15 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास डायलिसिस सुरू करणे सुरक्षित मानले जाते.खाजगी रुग्णालयांमध्ये एका डायलिसिस सत्राचा खर्च 3 ते 4 हजार रुपये इतका येतो. आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करणाऱ्या रुग्णाला महिन्याला सुमारे 24 हजार, तर तीन वेळा करणाऱ्या रुग्णाला 35 ते 36 हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र आता सरकारी रुग्णालयात ही सुविधा मोफत उपलब्ध झाल्याने गरजू रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या व सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होणार आहे, असा विश्वास डॉ. चारुदत्त शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »