रस्ता दुरुस्तीसाठी एल्गारचा एल्गार! — प्रेतयात्रा, रास्ता रोकोनंतर प्रशासनाला जाग

बातमी शेअर करा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेविरोधात एल्गार कष्टकरी संघटनेचे प्रखर आंदोलन — तीन तास रस्ता रोको व प्रेतयात्रेनंतर शासनाचे डोळे उघडले

त्र्यंबकेश्वर, ता.११ नोव्हेंबर —त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेने दीर्घकाळापासून चालवलेला लढा अखेर रंगला. संघटनेच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.

आज देवगाव फाटा ते श्रीघाट या तीन किलोमीटरच्या मार्गावर ‘मृत अवस्थेमधील सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रेतयात्रा’ काढण्यात आली. एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत सुमारे तीन तास रस्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनामध्ये सुरेखा मधे, मंगल खडके, मथुरा भगत, विमल ठोबरे, वसंत इरते, संजय पारधी, हनुमंत सराई, गणेश गोहिरे, अंकुश मधे, भगवान बांगरे, तानाजी कुंदे, गणपत गावडा, विठ्ठल ढोले, शांताराम पादिर, भावडू निरगुडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुमावत (त्र्यंबक) आणि उपअभियंता जाधव (इगतपुरी) यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.

“अनेक आश्वासनं पण कृती शून्य”

एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ‘रस्त्याची दुरुस्ती करा’ या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वासन दिले होते; परंतु एक वर्ष उलटूनही काम सुरू झाले नाही.त्याचप्रमाणे झारवड ते जोशी कंपनी रस्ता दुरुस्त करण्यासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मक वृक्षरोपण केले होते. उपअभियंत्यांनी त्या वेळीही आश्वासन दिले; मात्र ते हवेतच राहिले.

रस्त्यांची चाळण, अपघातांची वाढ”

त्र्यंबक–देवगाव–श्रीघाट तसेच वैतरणा धरण–जोशी कंपनी या मार्गांची अक्षरशः चाळण झाली असून प्रवाशांना प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत.हर्षवाडी, कळमूस्ते, आळवंडी धरण, जोशी कंपनी ते झारवड बु. या मार्गावरील रस्त्यांची परिस्थितीही अत्यंत बिकट आहे. या संदर्भात संघटनेने अनेक वेळा लेखी निवेदने, तक्रारी आणि आंदोलने केली; मात्र विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती.

अखेर आंदोलनानंतर कामाला सुरुवात

आजच्या प्रेतयात्रा आणि रस्ता रोको आंदोलनानंतर बांधकाम विभागाने अखेर रस्त्यांच्या दुरुस्तीस सुरुवात केली. त्यामुळे संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले.एल्गार कष्टकरी संघटनेच्या आंदोलनाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, “जनशक्ती जागली की यंत्रणा हलते!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »