ॲड चंद्रशेखर गिते (नाशिक शहर प्रतिनिधी) : येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज पार पडली असून, प्रभागनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण तसेच महिला आरक्षणाचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीनंतर राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून सर्वच पक्षांनी आता उमेदवारीच्या चर्चांना वेग दिला आहे.
आरक्षणाच्या निकालानुसार, पंचवटी, पश्चिम, सातपूर, पूर्व, नाशिकरोड आणि सिडको अशा सहा विभागांमध्ये वेगवेगळ्या प्रभागांना विविध आरक्षण लागू झाले आहे.
पंचवटी विभागातील प्रभागनिहाय आरक्षण:१ ते ६ क्रमांकाच्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व सर्वसाधारण श्रेणीतील महिला तसेच सर्वसाधारण उमेदवारांना संधी.
विशेषतः १ व २ प्रभागात अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण निश्चित झाल्याने या भागातील पारंपरिक राजकीय समीकरणांमध्ये बदल दिसणार आहेत.
पश्चिम विभाग: ७, १२ आणि १३ क्रमांकाच्या प्रभागांमध्ये ओबीसी व अनुसूचित जातींसह महिलांना आरक्षण.
१२ क्रमांकाचा प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव ठरल्याने अनेक माजी नगरसेवकांच्या अपेक्षा बदलणार आहेत.
सातपूर विभाग: ८ ते ११ आणि २६ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व महिला उमेदवारांना समान संधी.
सातपूर विभागात महिला उमेदवारांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता.
पूर्व विभाग: १४, १५, १६, २३ आणि ३० क्रमांकाचे प्रभाग.येथेही अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व.
१६ व २३ क्रमांकाच्या प्रभागांमध्ये सर्व श्रेणींतील प्रतिनिधित्व दिसून येते.
नाशिकरोड विभाग: १७ ते २२ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती व ओबीसी महिलांना मोठ्या प्रमाणात संधी.
महिला उमेदवारांसाठी हा विभाग “महिला बालेकिल्ला” ठरण्याची चिन्हे.
सिडको विभाग: २४ ते ३१ प्रभागांमध्ये ओबीसी व अनुसूचित जाती महिलांचे वर्चस्व.
२७ क्रमांकाचा प्रभाग अनुसूचित जाती महिला आणि अनुसूचित जमाती आरक्षित ठरल्याने सिडकोत नव्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
या आरक्षण सोडतीनंतर आता नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे. विविध पक्षांतील नेत्यांनी प्रभागनिहाय आरक्षणाचा अभ्यास सुरू केला असून उमेदवारीच्या चर्चांना वेग आला आहे.राजकीय पक्षांच्या रणनिती, संघटनात्मक हालचाली आणि आरक्षणामुळे निर्माण होणारे नवे राजकीय समीकरण — यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
