कुंभनगरीत भाजपाची शक्तिप्रदर्शन सभा; फडणवीस–महाजनांचा विकासाचा संदेश

बातमी शेअर करा

काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर) : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्र्यंबकेश्वर कुंभनगरीत भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

सभेत भाजपाचे प्रमुख नेते— माजी केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार, माजी आमदार वैभव पिचड, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमाताई हिरे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, तालुकाध्यक्ष सुयोग्य वाडेकर, शहराध्यक्ष तेजस ढेरगे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच विविध अखाड्यांतील साधू–महंतांची मोठी उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनही या मेगा सभेला उपस्थित होते.

यावेळी भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,“त्र्यंबकेश्वर ही पवित्र कुंभनगरी आहे. या शहराचा सार्वजनिक विकास, सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आणि भावी प्रगतिसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणं अत्यावश्यक आहे.”

याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनीही नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार कैलास घुले यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सभेत जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की,“भाजप सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील विकासकामांना गती देणे हा भाजपाचा प्रमुख उद्देश आहे.”या जाहीर सभेसाठी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांची विक्रमी उपस्थिती पाहायला मिळाली असून, आगामी निवडणुकीत भाजपाची मदार आणखी मजबूत झाल्याचे चित्र दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »