त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्रिवेणी ताई तुंगार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची उत्साहवर्धक उपस्थिती लाभली.
या सभेला नाशिक जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, माजी आमदार अजय बोरसे, काशिनाथ मेंगाळ, रवींद्र भोये यांच्यासह त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यातील पदाधिकारी–कार्यकर्ते तसेच लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहरातील साधू–महंतांनीही सभेस हजेरी लावून सहकार्य दर्शविले.
“जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त करताना शिंदे साहेबांनी बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला. त्र्यंबकेश्वरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना शिंदे गट सक्षम असल्याचे सांगत, “धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबा आणि सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
यावेळी मंत्री दादा भुसे यांनी, “या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा झेंडा त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेवर अभिमानाने फडकवू,” असा विश्वास व्यक्त केला. प्रभावी वक्तव्य, घोषणाबाजी आणि मोठ्या उत्साहात ही सभा पार पडली असून त्र्यंबकेश्वरच्या निवडणूक राजकारणाला नव्या उमेदीची दिशा मिळाल्याचे दिसून येत आहे.
