“आजची विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक होण्यासाठी संविधानाची अंमलबजावणी आवश्यक”-ॲड. भारत बुकाने

बातमी शेअर करा

“आजची विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक व्हावेत, त्यासाठी संविधानाची अंमलबजावणी आणि जाण असणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन ॲड. भारत बुकाने यांनी केले. जिल्हा परिषद शाळा वाडीवऱ्हे यांच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी किशोर दळवे होते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी व त्यांचा संपूर्ण आरोग्य कर्मचारी वर्ग, माजी सरपंच रोहिदास कातोरे, युवा नेते किरण कातोरे, तानाजी अहिराराव, सोनवणे सिस्टर, धनंजय पगार आणि साकुरचे पोलीस पाटील शिवाजी सहाणे यांची मान्यवर अतिथी म्हणून उपस्थिती होती.

संविधान फेरीद्वारे विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती करत कार्यक्रमाची सुरुवात केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि संविधान प्रतीकास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. ॲड. भारत बुकाने यांनी संविधानाचे शालेय जीवनातील महत्त्व स्पष्ट करताना म्हटले की,“भारतीय संविधानाने सर्वांना समान मूलभूत हक्क बहाल केले आहेत. विद्यार्थी जर शालेय वयातच संविधानाचे मूल्य आत्मसात करतील, तर नक्कीच ते उद्याचे प्रबुद्ध आणि सुजाण नागरिक बनतील.”

कार्यक्रमानंतर त्यांनी शाळेला भारतीय संविधान ग्रंथ भेट दिला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दीपक खैरनार, रेखा बच्छाव, सुनीता जाधव आणि कविता कोळसुरे मॅडम यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रकांत सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मिता गायकवाड मॅडम यांनी केले.समारोपाला सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान पूजन केले आणि लोकशाही मूल्यांची कदर करण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »