त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी: त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीत या वेळेस विक्रमी 85 टक्क्यांपर्यंत मतदान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीला आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेध लागल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नगरपालिकेतील एकूण 12,835 मतदार विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडे आशेने पाहत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यांसह उच्चस्तरीय मंत्र्यांच्या सभा त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडल्या. त्यामुळे कोण पक्ष सत्ता राखणार? कोण नगराध्यक्षपदावर विराजमान होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
उमेदवारांनी त्र्यंबक नगरीचा कोपरा-कोपरा पिंजून काढला आहे. ज्यांचे नाव मतदार यादीत आहे अशांना कोणतीही तक्रार राहू नये याची विशेष खबरदारी घेतली जात आहे.मतदारांच्या उत्साहाचा फायदा घेत या निवडणुकीत 10,000 ते 11,000 दरम्यान मतांचा ओघ मतदान केंद्रांवर दिसण्याची अपेक्षा आहे.त्र्यंबकेश्वरकरांच्या उत्साही सहभागामुळे यंदाची निवडणूक विक्रमी मतदानाची नोंद करेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
