निसर्गरम्य इगतपुरीत ‘शिवसृष्टी’ उभारण्याची मागणी; पर्यटनासह अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

बातमी शेअर करा

इगतपुरी (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेले आणि मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे इगतपुरी शहर पर्यटनासाठी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ‘शिवसृष्टी’ उभारण्याची मागणी इगतपुरी नगर परिषदच्या नगराध्यक्षा सौ. शालिनी संजय खातळे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.दरम्यान, गोरख बोडके तसेच शिवसेनेचे युवा नेते संजय खातळे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन इगतपुरी नगरपरिषदेची ही मागणी मंजूर करण्याची विनंती केली.

पावसाचे माहेरघर आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटिश काळापासून प्रसिद्ध असलेले इगतपुरी शहर निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते. तसेच येथे असलेल्या धम्मगिरी विपश्यना आंतरराष्ट्रीय केंद्रमुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. या पार्श्वभूमीवर शहराच्या पर्यटनात अधिक भर पडावी आणि भावी पिढीसह पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राची माहिती मिळावी, यासाठी ‘शिवसृष्टी’ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

पर्यटन वाढून अर्थव्यवस्थेला चालना: ‘शिवसृष्टी’ उभारल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडून पर्यटन वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी व्यक्त केला.

सकारात्मक निर्णयाचे आश्वासन: दरम्यान, इगतपुरी नगरपरिषदेच्या मागणीची राज्य सरकारने सकारात्मक दखल घेतली असून याबाबत योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.

नगरपालिकेला आर्थिक बळ मिळणार: ‘शिवसृष्टी’ प्रकल्पामुळे पर्यटन वाढून नगरपालिकेचे उत्पन्न वाढेल व इगतपुरी नगर परिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा दावा शिवसेना नेते संजय खातळे पाटील यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »