भावली खुर्द येथे बेकायदेशीर डोंगर उत्खननाचा गंभीर आरोप– आदिवासी समाज आक्रमक; दफनभूमीवरही अतिक्रमण

बातमी शेअर करा

मौजे भावली खुर्द, तालुका इगतपुरी येथे बेकायदेशीरपणे डोंगर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक आदिवासी समाजाकडून करण्यात आला आहे. या उत्खननामुळे गावाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला असून, सदर डोंगरालगत असलेल्या दफनभूमीवर देखील अतिक्रमण करून विटाबांधकाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी सुनंदा विठ्ठल आगिवले यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

अर्जात नमूद केल्यानुसार, भावली खुर्द हे गाव पूर्णपणे आदिवासी क्षेत्रात येते. या परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाह मुख्यतः शेती, मजुरी आणि डोंगरदऱ्यातील नैसर्गिक वनस्पतींवर अवलंबून आहे. या डोंगरावर अनेक फळझाडे, औषधी वनस्पती तसेच पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची झाडे आहेत.

अर्जात ग्रामसभा व पारंपरिक ग्रामसभा यांची कोणतीही परवानगी न घेता आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता डोंगर उत्खननास परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा भाग पाचव्या अनुसूचित क्षेत्रात येत असल्याने पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभेची परवानगी अनिवार्य आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची संमती न घेता काम सुरू करण्यात आल्याने आदिवासी समाजात तीव्र नाराजी आहे.

याशिवाय डोंगरालगत असलेल्या दफनभूमीवर अतिक्रमण करून विटाबांधकाम करण्यात आल्याचा प्रकारदेखील उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या गेल्या असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे की, जर उत्खनन असेच सुरू राहिले तर भूस्खलन, दरडी कोसळणे आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण गाव धोक्यात येऊ शकते.आदिवासी समाजाच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे की, सदर डोंगरावरील उत्खननाचे काम तात्काळ थांबवण्यात यावे व संबंधित अधिकाऱ्यांवर आणि उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »