नाशिक व मालेगाव शहरातील नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन’ ही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून, या व्हॅनद्वारे दररोज सुमारे 150 नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी केली जाणार आहे.या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख (सर्व्हिक्स) कर्करोगाची तपासणी व स्क्रिनिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांसाठी मोफत बायोप्सी सुविधा आणि प्राथमिक उपचारांची सोय करण्यात आली आहे.
या तपासण्यांसाठी तज्ज्ञ दंतशल्य चिकित्सक व स्त्रीरोग तज्ञांची उपस्थिती असणार आहे. नागरिकांमध्ये कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणे व आजाराचे लवकर निदान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले.
व्हॅनचे वेळापत्रक: १ डिसेंबर ते १५ डिसेंबर – नाशिक शहरातील विविध प्रभागांमध्ये सेवा
१६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर – मालेगाव शहरातील विविध भागांमध्ये सेवा
स्थानिक महानगरपालिका अधिकारी, प्रभाग अधिकारी, आशा व एएनएम कर्मचारी यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत व्हॅनचे वेळापत्रक पोहोचवण्यात येणार आहे.
📢 अधिकाऱ्यांचे आवाहन
कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे नागरिकांनी या मोफत तपासणी मोहिमेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहनजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे,माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते,नाशिक मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देवकर वमालेगाव मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री आहेर यांनी केले आहे.
