तळेगावात भात शेती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव हे भात शेतीचे प्रमुख क्षेत्र असून, गावातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी भात उत्पादनावर अवलंबून आहेत. सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत तळेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने भात पिकावरील शेतीशाळा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला भात उत्पादक शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 अंतर्गत मंगळवारी (दि. 25 ऑगस्ट) भात शेतीशाळेचा वर्ग क्रमांक 03 घेण्यात आला. सध्या भात पीक फुटवे अवस्थेत असल्याने या वाढीच्या अवस्थेत घ्यावयाची काळजी, पिकाचे निरीक्षण आणि रोग-किडींचे व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भात पीक परिसंस्था विश्लेषण (Rice Ecosystem Analysis – RESA) या संकल्पनेची माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष भात शेतातील परिसंस्थेचे निरीक्षण, चित्रीकरण, सादरीकरण, चर्चा आणि त्यावर आधारित निष्कर्ष काढण्यात आले. तसेच विविध मित्रकीटक आणि त्यांचे भात शेतीतील महत्त्व, भातावरील विविध रोग व त्यांचे व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.याशिवाय ग्रामस्तरीय कृषी अवजार बँक प्रकल्प आणि शेतकरी फार्मर आयडी कार्ड याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतले.या कार्यशाळेसाठी सहायक कृषी अधिकारी धीरज बागुल आणि समूह सहायक सतीश रखमा खेमनर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नारायण हरी पारधी यांच्यासह तळेगावातील अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.तळेगावसारख्या भात उत्पादनासाठी महत्त्वाच्या गावात प्रत्यक्ष शेतावर घेण्यात आलेल्या या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना भात पिकाच्या शास्त्रीय व्यवस्थापनाची माहिती मिळाली असून, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा उत्पादनवाढीसाठी निश्चितच फायदा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »