बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर येथे ‘व्हीआयपी दर्शन’ करून देण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दर्शनासाठी भाविकांना चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने अनेक जण ‘देणगी दर्शन पास’चा पर्याय निवडतात. मंदिर देवस्थान ट्रस्टकडून २०० रुपयांमध्ये देणगी दर्शन पासची सुविधा उपलब्ध आहे.दरम्यान, पंचवटी परिसरातील दोन भाविक देणगी दर्शन पास घेऊन दर्शनासाठी रांगेत उभे असताना संशयितांनी त्यांना गाठले. “तुम्हाला या पासने दर्शनासाठी चार ते पाच तास लागतील, मात्र आम्ही फक्त १० मिनिटांत व्हीआयपी दर्शन करून देतो,” असे सांगून त्यांनी भाविकांना फसवले.संशयितांनी भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन घडवले आणि त्यानंतर ‘व्हीआयपी दर्शन’च्या नावाखाली तीन हजार रुपये उकळले. मात्र मंदिर देवस्थान ट्रस्टकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत शुल्क आकारणी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच संशयितांनी भाविकांना कोणतीही पावती दिली नव्हती.
या प्रकरणी गोटीराम पेहरे (वय ४१, रा. खडकवाडी, त्र्यंबकेश्वर) आणि अभिषेक कडलग (रा. त्र्यंबकेश्वर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी गोटीराम पेहरे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून मंदिर परिसरात अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे
