मिरची पुड फेकून फायनान्स कर्मचाऱ्याची लूट करणारे तिघे जेरबंद; हरसूल पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ३.६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बातमी शेअर करा

महिला बचत गटाचे पैसे घेऊन जाणाऱ्या फायनान्स कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पुड फेकून लूट करणाऱ्या तीन आरोपींना हरसूल पोलिसांनी शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, टॅबलेट, बॅग, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख मा. डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी गंभीर गुन्ह्यांचा तातडीने उलगडा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.दि. ०५/०६/२०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता ए.यू. फायनान्स, नाशिक येथील कर्मचारी नवनाथ चंदर मोरे हे महिला बचत गटाचे पैसे गोळा करून पारधीपाडा ते लाडची गावादरम्यानच्या निर्जन रस्त्याने जात होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईकवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकून त्यांना खाली पाडले व पैशांची बॅग हिसकावून विळवंडीच्या दिशेने पळ काढला.

याप्रकरणी नवनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर हे करत होते.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने विशेष पथक तयार करून गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »