स्वच्छता अभियानाचे जनक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त माणिकखांब गावात एक प्रेरणादायी स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादनाने करण्यात आली.या अभियानात गावातील परिसर, सार्वजनिक ठिकाणे व शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय ए. सी. सर, दामोदर बच्छाव सर, सोमनाथ सोनवणे सर, ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे पवार सर, तसेच ॲड. सोपान बंडू चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.या उपक्रमासाठी बंटी पगारे (वृक्षप्रेमी, दारणा नदी सेवक, इगतपुरी तालुका) यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. तसेच स्वच्छता अभियानासाठी हॅन्डग्लोज उपलब्ध करून दिल्याबद्दल नाशिक जिल्हा केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सहसचिव रामदास भाऊ गव्हाणे यांचे आयोजकांच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले.
संत गाडगेबाबांच्या विचारांना कृतीतून उजाळा देणारा हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
