इगतपुरी नगरपरिषदेत सत्तांतर! शिंदे गट–राष्ट्रवादी युतीची शालिनी खातळे नगराध्यक्ष, ५८७० मतांनी दणदणीत विजय

बातमी शेअर करा

इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीच्या उमेदवार शालिनी खातळे यांनी दणदणीत विजय मिळवत इगतपुरीच्या राजकारणात मोठे सत्तांतर घडवून आणले आहे.

एकूण १७,२२४ मतांपैकी शालिनी खातळे यांना १०,१५१ मते मिळाली, तर भाजपाच्या उमेदवार मधुमालती मेंद्रे यांना ४,२८१ मते मिळाली. यामुळे खातळे यांनी तब्बल ५,८७० मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.या निवडणुकीत नगरपरिषदेच्या सदस्यसंख्येतही शिंदे गट–राष्ट्रवादी युतीने वर्चस्व सिद्ध केले. युतीचे १८ नगरसेवक विजयी झाले असून भाजपाचे २, तर शिवसेना (उबाठा गट) चा १ उमेदवार विजयी झाला आहे.गेल्या ३० वर्षांपासून नगरपरिषदेवर सत्ता अबाधित ठेवणारे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा व त्यांनी उभ्या केलेल्या पॅनलचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. शिवसेना (उबाठा गट) मधून दीर्घकाळ सत्ता भोगल्यानंतर ऐनवेळी भाजपात प्रवेश करून निवडणूक लढविल्याचा फटका इंदुलकर यांना बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश शिरोळे यांनी पराभव केला, तर गेल्या ३० वर्षांपासून इंदुलकर यांना कडवी टक्कर देणारे माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण यांनी दणदणीत विजय मिळवला.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे १३, शिवसेना (शिंदे गट) चे ५, भाजपाचे २ आणि शिवसेना (उबाठा गट) चा १ उमेदवार निवडून आला आहे.इगतपुरी नगरपरिषदेतील हा निकाल म्हणजे मतदारांनी दिलेला स्पष्ट संदेश असून, आगामी काळात शहराच्या राजकारणात मोठे बदल घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »