खंबाळे शाळेला पदवीधर शिक्षक नसल्याने शिक्षण ठप्प; 26 जानेवारीपर्यंत शिक्षक न मिळाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा

बातमी शेअर करा

विशाल रोकडे (इगतपुरी प्रतिनिधी) : इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावातील जिल्हा परिषद शाळेत गेल्या तीन महिन्यांपासून पदवीधर शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे ठप्प झाले आहे. मराठी, गणित, इंग्रजी व विज्ञान हे अत्यावश्यक विषय शिकवले जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर खंबाळे गावातील पालकवर्गाने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना निवेदन देत तीव्र इशारा दिला आहे. शासन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, याचा थेट परिणाम त्यांच्या भवितव्यावर होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पालकवर्गाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर येत्या 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) पर्यंत तात्काळ पदवीधर शिक्षक उपलब्ध करून दिले नाहीत, तर शाळेला कुलूप ठोकून मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडले जाईल. या संभाव्य आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.निवेदन देताना तुकाराम चौधरी, विठ्ठल चौधरी, मच्छिंद्र चौधरी, सचिन रोकडे, संतोष घायवट, सचिन कडवे, नवनाथ शिंगोटे, मनेश रोकडे, विशाल रोकडे आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्वरित शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी पालकवर्गाकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »