संत निवृत्तीनाथ यात्रेला प्रारंभ! शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय महापूजा, त्र्यंबकेश्वर नगरीत भक्तीचा महासागर

बातमी शेअर करा

काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी): संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पावन यात्रेतील महत्त्वाचा मान यंदा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांना मिळणार असून, पौष वारी एकादशी व मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर बुधवारी (दि. १४ जानेवारी) पहाटे चार वाजता शासकीय महापूजा त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या वेळी त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, मान्यवर पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.नगरपालिकेच्या वतीने होणाऱ्या या पूजेला शासकीय महापूजा असे संबोधले जाते. या महापूजेनंतरच संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला अधिकृत प्रारंभ झाल्याचे मानले जाते. तत्पूर्वी, संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने मध्यरात्रीनंतर बारानंतर षडोपचार महापूजा करण्यात येते. या विधीचे पौरोहित्य मंदिराचे परंपरागत पुजारी गोसावी बंधू करतात.

दरम्यान, दुपारी चार वाजता संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरातून संत निवृत्तीनाथांचा चांदीचा रथ भाविकांच्या साक्षीने निघणार आहे. या रथामध्ये संत निवृत्तीनाथांची पालखी व मूर्ती असते. मंदिर–सुंदराबाई मठ–केळी गल्ली–त्र्यंबकेश्वर मंदिर–कुशावर्त–संत निवृत्तीनाथ मंदिर असा सुमारे अडीच तास चालणारा भव्य पालखी सोहळा होणार असून, या मिरवणुकीत हजारो वारकरी भक्तीभावाने सहभागी होणार आहेत.त्र्यंबकेश्वर नगरीत सध्या लक्षावधी वारकरी आणि शेकडो दिंड्या दाखल झाल्या असून, संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने ‘निर्मळ वारी’ व ‘स्वच्छ वारी’ संकल्पनेअंतर्गत उत्कृष्ट नियोजन केले आहे. आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, वन विभाग, मंदिर ट्रस्ट व डॉक्टरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.यात्रेनिमित्त संत निवृत्तीनाथ मंदिर व परिसराची भव्य व आकर्षक सजावट करण्यात आली असून, या सजावटीचे काम कैलास माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. फुलांची आरास, विद्युत रोषणाई व पारंपरिक सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला आहे.

आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने दक्षता पथक स्थापन करण्यात आले असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे संपर्क क्रमांक समाविष्ट असलेला आराखडा तयार करण्यात आला आहे. प्लास्टिक बंदी, स्वच्छ सर्वेक्षण व पर्यावरण संवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.यात्रा काळात नगरपालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी तळ ठोकून कार्यरत असून, गावातील सर्व प्रमुख ठिकाणे सीसीटीव्ही कक्षेत आणण्यात आली आहेत. स्वतंत्र सीसीटीव्ही नियंत्रण कक्षामुळे नियोजन अधिक सुलभ झाले आहे. मुख्याधिकारी, अभियंते यांच्यासह संपूर्ण यंत्रणा सतर्क असून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर नगरीत भक्ती, शिस्त व सुव्यवस्थेचे सुंदर दर्शन घडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »