आज दिनांक 23 जानेवारी 2025 वार शुक्रवार रोजी महाराष्ट्र समाज सेवा संघ नाशिक, संचालित मा. विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा येथे MCF क्रीडामहोत्सव व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी मा.श्री तुषार माळोदे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व पोलीस उपनिरीक्षक काशिगाव पोलीस ठाणे, मीरा भाईंदर), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.सुधाकर साळी (अध्यक्ष – महाराष्ट्र समाज सेवा संघ नाशिक), संस्था सचिव मा.श्री.शांताराम अहिरे, संस्था सहसचिव मा.श्री.पंकज पवार, संस्था कार्यकारणी सदस्य मा.श्री.अशोक बाविस्कर तसेच पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख अतिथींचे स्वागत घुंगरू काठी, मार्चपास व स्वागत गीताने करण्यात आले. अतिथींच्या शुभहस्ते क्रीडाज्योतचे प्रज्वलन करण्यात आले. संस्था सहसचिव मा.श्री.पंकज पवार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविक पर मनोगतातून व्यक्त करताना आश्रमशाळेची स्थापना ते आश्रमशाळेची प्रगतीच्या दिशेने होणारी वाटचाल यात संस्था विश्वस्त मंडळ, कार्यकारणी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे योगदान. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळेत सुरू असलेले उपक्रम याविषयीची सविस्तर माहिती दिली. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.नितीन पवार यांनी शैक्षणिक अहवालाच्या रूपाने शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा उपस्थितांच्या समोर सादर केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री तुषार माळोदे (पोलीस उपनिरीक्षक काशिगाव पोलीस ठाणे) यांनी आपल्या अतिथी मनोगतातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देऊन आरोग्य, शिस्त, जिद्द, सातत्य व सराव यांचा उत्तम संगम म्हणजे यशाची गुरुकिल्ली होय.विद्यार्थ्यांनी लहानपणापासून खेळाची आवड जोपासली पाहिजे हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्था अध्यक्ष मा. श्री. सुधाकर साळी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सामाजिक बांधिलकी, संस्कार, राष्ट्रभक्ती व कृतज्ञता या सामाजिक मूल्यांची आपल्या जीवनात रुजवणूक करावी. तसेच शाळेच्या क्रीडांगणाचा पुरेपूर वापर करून आपल्या क्रीडा गुणांना वाव द्यावा. याविषयीचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रम दरम्यान MCF द्वारे मल्लखांब, फायर जंप, लाठीकाठी, तलवार बाजी, रोप मल्लखांब व सिंदूर ऑपरेशन इत्यादी चित्तथरारक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. संदीप चौधरी (प्राथ. मुख्याध्यापक) यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आत्माराम कोरडे व श्री नामदेव कचरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न केले.
