नाशिक : स्टेप फाउंडेशन आणि अनुभव शिक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 व 22 फेब्रुवारी 2026 रोजी ‘ॲक्टिव्ह सिटीजन’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा चुंचाळे, नाशिक येथील सह्याद्री लॉन्स व हॉल येथे पार पडली.कार्यशाळेचा कारभार अनुभव शिक्षा केंद्राचे अध्यक्ष दीपक देवरे, उपाध्यक्षा सरस्वती शिंदे तसेच सहकारी कुणाल पाटील, रोहित भडांगे आणि आदर्श शेजवळ यांनी सांभाळला. कार्यशाळेचे मार्गदर्शक व प्रशिक्षक अॅड. निलेश खानविलकर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
पहिल्या दिवशी सहभागींची ओळख करून देण्यात आली. संविधान निर्मिती प्रक्रियेवरील माहितीपट दाखवण्यात आले तसेच संविधानातील संकल्प व संकल्पना उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या. विविध खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून सहभागींचा सक्रिय सहभाग घेतला गेला. परिसरातील उपलब्ध साहित्य वापरून भारताचा नकाशा तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच हॉलीबॉल, पावर गेम आणि नाट्यरूप सादरीकरणाद्वारे विविध सामाजिक विषय मांडण्यात आले.
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने झाली. संविधानातील मूल्ये, मूलभूत अधिकार तसेच विविध स्तरांवरील व्यवस्थांकडे समस्या कशा मांडाव्यात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. खेळ व उपक्रमांद्वारे संविधानाची ओळख अधिक दृढ करण्यात आली.कार्यशाळेच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होऊन सक्रिय नागरिकत्वाची भावना वृद्धिंगत झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
