तळेगाव, ता. त्र्यंबक येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात, सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन घडवत साजरी करण्यात आली. गावातील एका अपंग अंध व्यक्तीच्या दशक्रिया विधी आजच पार पडले असतानाही गावकऱ्यांनी दुःखावर मात करत, माता रमाई व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती निष्ठा ठेवून सामाजिक बांधिलकी जपली.गावातील महिलांनी मिळालेल्या संविधानिक अधिकारांचा स्वावलंब साधत, गावातील नियोजित कार्यक्रम पार पाडून माता रमाईंचे स्मरण केले. संध्याकाळी ठीक सात वाजता सर्व गावकरी, मान्यवर पाहुणे एकत्र येत तळेगावात सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले. आनंदमय वातावरणात माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष तथा संघटक नामदेव गांगुर्डे, काशिनाथ गांगुर्डे यांच्यासह युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन त्रिशरण-पंचशील ग्रहण करत जयंती साजरी केली.दरम्यान, सकाळी तळेगाव-त्र्यंबक प्राथमिक विद्यामंदिर शाळेत पत्रकार काळू गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना कॅडबरी चॉकलेट वाटप करून जयंती साजरी केली. त्यांनी विद्यार्थ्यांना माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खंबीर नेतृत्वामागे असलेल्या महामाई रमाई यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
“एका पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा आधार असतो, तेव्हाच तो पुढे जातो,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी आपल्या भाषणातून मांडले. तसेच धर्म व परंपरेनुसार प्रत्येक गावात व तालुक्यात दर रविवारी बुद्धवंदना करण्याचा, संघटित राहून संघर्ष करण्याचा संकल्प सर्वांना दिला.एकूणच तळेगाव-त्र्यंबक येथे माता रमाई जयंती केवळ उत्सव न राहता सामाजिक एकता, करुणा आणि स्वाभिमानाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला
