घोटी (ता. इगतपुरी) :भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम अंतर्गत घोटी शहर शाखा महिला व पुरुष कार्यकारणी तसेच नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट घोटी शहर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती शनिवार दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता नालंदा बुद्ध विहार, घोटी येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद घोटी शहर शाखेच्या अध्यक्ष वंदनाताई किशोर रूपवते यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेस उपस्थित महिला उपासिका व कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर त्रिशरण, पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण व भीमस्तुती घेण्यात आली.
जयंतीनिमित्त आयोजित काव्यसंमेलनात माता रमाई यांच्या त्याग, संघर्ष, दुःख, कष्ट व खंबीर नेतृत्वावर आधारित हृदयस्पर्शी कविता सादर करण्यात आल्या. या काव्यसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक कवी आयु. निशांत गुरू यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन कवी पंढरी पगारे यांनी केले. उपस्थित सर्व कवींनी आपल्या सादरीकरणातून माता रमाई यांना आदरांजली अर्पण केली.कार्यक्रमाची विशेष शोभा वाढवली ती भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम महिला कार्यकारणीच्या माजी कोषाध्यक्ष आयु. नी. कविताताई अरुण बोर्डे यांनी सादर केलेल्या हृदयस्पर्शी एकपात्री प्रयोगाने. माता रमाई यांच्या जन्मापासून ते निधनापर्यंतचा संघर्षमय जीवनप्रवास, कुटुंबातील दुःख, जबाबदाऱ्या व बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहून दिलेले मोलाचे योगदान त्यांनी प्रभावीपणे सादर केले. त्यांच्या अभिनयाने उपस्थित उपासक-उपासिकांच्या डोळ्यांत अश्रू तर अंगावर काटा आणणारे क्षण निर्माण झाले.
याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा शाखा घोटी शहर पुरुष कार्यकारणीचे सरचिटणीस आयु. सिद्धार्थ रामचंद्र बर्वे यांचे चिरंजीव कु. राहुल सिद्धार्थ बर्वे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर आधारित भावनिक भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कवी, मान्यवर वक्ते व कलाकारांचा आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार घोटी येथील माजी उपसरपंच (बौद्धाचार्य) आयु. मदन रूपवते यांनी मानले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपासक-उपासिका, महिला कार्यकर्त्या, कवी, साहित्यिक व नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी व भावनिक वातावरणात संपन्न झाला.
