८ हजार मानधनाचा जीआर धूळखात! ग्रामरोजगार सेवकांच्या काम बंद संपाला त्र्यंबकेश्वरचा जाहीर पाठिंबा

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी : शासनाने जाहीर केलेले निर्णय कागदावरच राहतात का? असा सवाल उपस्थित करत APO, PTO व CDEO यांच्या अडीअडचणी तसेच प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या ग्रामरोजगार सेवकांच्या काम बंद संपाला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत ग्रामरोजगार सेवकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.महाराष्ट्र राज्य रोजगार सेवक संघटना, त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथील माननीय गट विकास अधिकारी यांना सविस्तर निवेदन देत दरमहा ८,००० रुपये मानधन देण्याचा शासन निर्णय (GR) अद्यापही अमलात न आणल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

ग्रामपंचायत स्तरावर महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना ८,००० रुपये मासिक मानधन, विमा संरक्षण, मोबाईल रिचार्ज व टॅब, तसेच अनेक ग्रामपंचायतींमध्ये मूलभूत सुविधा नसताना काम करावे लागत असल्याने संगणक व प्रिंटर तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.सध्या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जात असून, त्यामुळे विलंब व अडचणी निर्माण होत आहेत. हे मानधन थेट ग्रामरोजगार सेवकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावे, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली.

याशिवाय गावातील राजकीय किंवा अंतर्गत मतभेदांमुळे कोणतीही चौकशी न करता थेट ठराव करून ग्रामरोजगार सेवकांना कामावरून काढण्यात येत असल्याच्या घटनांवर संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली. चूक नसतानाही सेवकांवर होणाऱ्या अन्यायकारक कारवायांना शासनाने आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनास तालुका अध्यक्ष देवराम उघडे, तालुका उपाध्यक्ष पोपट भोये, तसेच उत्तम डबाळे, काळू बेंडकोळी, रामदास कुंदे , केरू पोटिंदे यांच्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामरोजगार सेवकांच्या प्रश्नांवर गट विकास अधिकारी यांनी तत्काळ सकारात्मक निर्णय घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करावा, अशी ठाम अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »