त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी):महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत टप्पा क्र. १ चे संयुक्त शिबिर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी मंडळात सामुंडी ग्रामपंचायत सभागृह येथे दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी उत्साहात पार पडले. हे शिबिर मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. जी.व्ही.एस. पवन दत्ता (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार श्री. गणेश जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.यावेळी श्री. वामनभाऊ खोसकर यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, सर्व नायब तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.शिबिरात मार्गदर्शन करताना मा. सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. जी.व्ही.एस. पवन दत्ता यांनी नागरिकांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे तात्काळ निवारण करण्यात आले.
तहसीलदार श्री. गणेश जाधव पाटील यांनी उपस्थित नागरिकांना शासकीय कामकाजासंदर्भातील तक्रारी किंवा अडचणी असल्यास आवश्यक कागदपत्रांसह संबंधित विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले. यावेळी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच सातबारा उताऱ्यातील नाव व क्षेत्र दुरुस्ती, रस्ता नोंदणी, बिनशेती परवानगी याबाबत शासनाच्या नवीन निर्णयांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.पंचायत समिती त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी श्री. रविकांत सानप यांनी पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.याचबरोबर भूमी अभिलेख उपअधीक्षक श्री. महेश राजगुरू यांनी जमीन मोजणी संदर्भातील कार्यवाही व त्यासंबंधित अडचणींबाबत ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले.शिबिरात स्वदेश फाउंडेशन, नाशिक यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखले, जात दाखले, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, डिजिटल सातबारा उतारे व खाते उतारे यांचे वाटप करण्यात आले.महिला व बालकल्याण विभाग, त्र्यंबकेश्वर यांच्या माध्यमातून बेबी केअर गेटचे वाटप करण्यात आले. तसेच विविध दाखल्यांसाठी सेतू कार्यालय, त्र्यंबकेश्वर यांचे विशेष पथक उपस्थित राहून अर्ज स्वीकारण्यात आले.याशिवाय नागरिकांचे आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती करण्यासाठी ई-सेवा केंद्राचे प्रकाश कदम व बालिका कदम हे पथक उपस्थित राहून आवश्यक कामकाज पार पाडले.सदर शिबिर मा. सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. जी.व्ही.एस. पवन दत्ता व तहसीलदार गणेश जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्री. मनोहर राठोड, ग्राम महसूल अधिकारी सौ. सविता म्हसाळ, सौ. ज्योती बहिरम, कु. जयक्षी गावीत, सौ. किरण पवार यांनी विशेष नियोजन करून यशस्वीपणे पार पाडले.
