त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव वाघेरा गावात येथे एका शेतकऱ्याच्या शेतात साठवून ठेवलेले अंदाजे 20 ट्रॅक्टर तनस व गवत अज्ञात इसमाने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याचे घर देखील जळून खाक झाले आहे.गावातील निवृत्त सैनिक श्री. लक्ष्मण चैतू महाले यांचे सुपुत्र श्री. देविदास लक्ष्मण महाले यांनी आपल्या जनावरांसाठी शेतात मोठ्या प्रमाणात तनस व गवत साठवून ठेवले होते. मात्र, अज्ञात व्यक्तीने त्यास आग लावल्यामुळे काही क्षणातच संपूर्ण तनस जळून खाक झाले.आगीची तीव्रता इतकी होती की शेजारील घरालाही आग लागली. त्या घरात जनावरे बांधलेली होती. सुदैवाने, देविदास महाले यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ जनावरे सुरक्षित स्थळी हलवली. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
या घटनेत तनस, गवत तसेच घराचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.घटनेनंतर महाले यांनी तात्काळ त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला असून नुकसान भरपाईसाठी तलाठी कार्यालयाकडेही अर्ज केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून संशयित इसमाचा शोध सुरू आहे.सदर प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलीस प्रशासनाने कसून चौकशी करून संबंधितास लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
