दारणा नदीत बेपत्ता साहिल जाधव प्रकरण : पाणी बंद न केल्याने संतप्त ग्रामस्थांचा घोटी–सिन्नर महामार्गावर रास्तारोको

बातमी शेअर करा

दारणा नदीपात्रात बेपत्ता झालेल्या साहिल जाधव या तरुणाचा शोध तीन दिवसांपासून सुरू असूनही तो अद्याप सापडलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने दारणा धरणाचे पाणी बंद करून शोधकार्याला मदत करावी, अशी मागणी वारंवार करूनही कोणतेही सहकार्य न मिळाल्याने ग्रामस्थांनी आज (दि. 10) सकाळी सुमारे 11:30 वाजता घोटी–सिन्नर महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले.दिनांक 08 मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, बचाव पथक आणि प्रशासनाकडून नदीपात्रात सतत शोधमोहीम सुरू आहे. मात्र दारणा धरणातून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने शोधकार्याला मोठा अडथळा येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर धरणाचे पाणी तात्काळ बंद करून शोधमोहीम सुलभ करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती. परंतु शासन, संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी घोटी–सिन्नर महामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडले असून, मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत दारणा धरणाचे पाणी बंद केले जात नाही आणि शोधमोहीम प्रभावीपणे राबवली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.साहिल जाधवच्या कुटुंबावर मोठे दु:ख कोसळले असून, संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभा राहत मदतीचा हात देत आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »