इगतपुरी (प्रतिनिधी):खंबाळे येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या सहा महिन्यांपासून पदवीधर शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विशाल रोकडे यांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी ओमकार पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी), जिल्हा शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने पालकवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.पदवीधर शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. विशेषतः परीक्षेचा काळ जवळ आला असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जर तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही, तर ऐन परीक्षेच्या काळात शाळेला कुलूप लावण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही पालकांकडून करण्यात आली आहे.
