त्र्यंबकेश्वर (नाशिक) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुमित ज्ञानपीठ अभियान नाशिक संचलित स्व. मधुकरराव हिरे अनुदानित प्राथमिक-माध्यमिक आश्रमशाळा, पिप्री येथे शिकणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थी संजय सदू नडगे याच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संजय नडगे हा दिनांक 12 रोजी शाळेतून अचानक बेपत्ता झाला होता. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी 13 तारखेला त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. मात्र, दिनांक 15 रोजी शाळेपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर, गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या पाझर तलावाजवळील घनदाट झाडीत आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.
स्थानिक नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रकल्प शिक्षण विस्ताराधिकारी भांगरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी शाळेच्या परिसरात मोठी गर्दी करत निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्याच्या मृत्यूस शाळेच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत संस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शाळेमध्ये निवासी कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाले असून, बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे आश्रमशाळांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित संस्था चालक व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.
