मूक नायक मैत्री संघ आणि दि पिपल्स वेलफेयर अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, ३ एप्रिल १९२७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत पाक्षिकाच्या ९९ व्या वर्षपूर्ती शताब्दी निमित्त तसेच संघ नायक न्यूजच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला “संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा – २०२६” नुकताच उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्यात उरुळी कांचन येथील साने संगीत लोक कलामंचचे संस्थापक शिवराज ज्ञानोबा साने यांना आदर्श कला संगीत शिक्षक म्हणून संघ नायक पुरस्कार–२०२६ प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला मुख्य आयोजक पत्रकार सदाशिव कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जेष्ठ पत्रकार एम. जी. शेलार, वीर गोविंद गोपाळ महार यांचे वंशज पांडुरंग गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर, जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलाब चौधरी, पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री अमोल भोसले, तसेच आबासाहेब चव्हाण, संदिप बडेकर, बाबासाहेब बेडेकर आदी मान्यवर व पुरस्कारप्राप्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजक पत्रकार सदाशिव कांबळे यांनी संघ नायकच्या स्थापनेमागील उद्देश, ध्येय व सामाजिक बांधिलकी याबाबत सविस्तर माहिती दिली. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार अनिल गायकवाड यांनी केले.पुरस्कार स्वीकारताना शिवराज साने यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन मला ‘संघ नायक पुरस्कार–२०२६’ देण्यात आला, याबद्दल आयोजकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. माझ्या यशामध्ये माझे आई-वडील, गुरुजन तसेच असंख्य मित्रमंडळींचे मोठे योगदान आहे.”
