मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल प्रशासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत इगतपुरी येथे भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिराला आमदार हिरामण खोसकर, अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, तहसीलदार अभिजित बारवकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश श्रीश्रीमाल यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले. यावेळी संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार विजय भंडारी, धनंजय लचके, वर्षा वाघ, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.शिबिरात नागरिकांसाठी १५ हून अधिक महसुली व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये आधार नोंदणी व दुरुस्ती, उत्पन्न, जात व अधिवास (डोमिसाईल) दाखले, कुंभार समाजाचे ओळखपत्र, ७/१२ उतारे, फेरफार नोंदी व नक्कल, ७/१२ व मालमत्ता पत्रक दुरुस्ती, तुकडेबंदी नियमीधीकरण, बिनशेती एकरकमी अधिमूल्य विषयक सेवा, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, नवीन व दुय्यम शिधापत्रिका, कर्जमाफी योजनांबाबत मार्गदर्शन, कृषी विभागाच्या विविध योजना, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, सर्वांसाठी घरे व अतिक्रमण नियमितीकरण विषयक मार्गदर्शन तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ उपलब्ध करून देण्यात आले.

याशिवाय नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन व चौकशी कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली होती. विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रलंबित कामांचा निपटारा, अर्ज स्वीकारणे, दाखल्यांचे वितरण तसेच योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.शासनाच्या सेवा “जनतेच्या दारी” पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे महसूल समाधान शिबिर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी लाभदायी ठरले. मोठ्या संख्येने नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »