कायमस्वरूपी रोजगारासाठी रोथे कंपनी कामगारांचे अन्नत्याग आंदोलन तीव्र

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज : इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथील रोथे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला अद्याप कोणतीही प्रतिसाद मिळालेला नाही. सुमारे १६० कामगार या आंदोलनात सहभागी असून, काही कामगारांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

कंपनीत यापूर्वी काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे तसेच स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगाराची हमी द्यावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. याबाबत व्यवस्थापनाकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस निर्णय न झाल्याने कामगारांनी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत कामगारांशी चर्चा केली. स्थानिकांच्या जमिनी, पाणी, वीज व रस्ते यांसारख्या संसाधनांचा वापर करून उद्योग उभा राहत असेल, तर परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाने आंदोलकांच्या मागण्यांवर तातडीने चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने कामगारांचे आंदोलन सुरूच आहे.कामगारांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे गोंदे परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला असून, पुढील घडामोडींकडे कामगारांसह स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »