आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अमास सेवा ग्रुप मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिल्लोळी येथील 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विविध सहयोग दात्यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.अमास सेवा ग्रुप मुंबई यांच्या माध्यमातून दरवर्षी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण तसेच गरजू ठिकाणी आवश्यक सुविधांची उपलब्धता करून दिली जाते. याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून यावर्षी तिल्लोळी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रमात सौ. लता गोरख भरसट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी अमास सेवा ग्रुपकडून सुरू असलेल्या सेवाभावी कार्याची माहिती उपस्थितांना दिली.श्रीमती ज्योती तुंगार यांनी विद्यार्थ्यांसाठी मिळालेल्या मदतीचे महत्त्व स्पष्ट करत समाजातील इतरांनीही गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कविता पाटील यांनी केले, तर श्रीमती वृषाली दहिवेलकर यांनी सहयोग दाते, आम्हास सेवा ग्रुप व उपस्थितांचे आभार मानले.या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी ऊर्जा मिळाली असून, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचा आदर्श निर्माण केला आहे.
