दिंडोरी | प्रतिनिधी : दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिल्लोळी येथे २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात योगासनांचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगासनांचे मानवी जीवनातील महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे फायदे तसेच आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.यावेळी शाळेच्या शिक्षिका वृषाली दहिवेलकर व ज्योती तुंगार यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांकडून योगासनांचा सराव करून घेत योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून देण्यात आले.
शिक्षिका कविता पाटील यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात आपल्या आरोग्यासाठी योगाचा नियमित स्वीकार करण्याची शपथ घेतली.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करून आनंददायी वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उपक्रम यशस्वी झाला.
