त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागातील प्रगतिशील रेशीम शेतकरी निवृत्ती बुधा ढोले यांना रेशीम शेती क्षेत्रातील उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि सातत्यपूर्ण कार्याबद्दल शासकीय सन्मानाने गौरविण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी रेशीम उद्योगात यशाची नवी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या निवृत्ती ढोले यांनी आर्थिक अडचणी, मर्यादित संसाधने आणि विविध आव्हानांवर मात करत रेशीम शेतीमध्ये सातत्याने प्रयोग केले. तुती लागवड, रेशीम कीटक संगोपन आणि आधुनिक व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांनी यशस्वी रेशीम उत्पादन करून परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
या यशस्वी प्रवासात त्यांचे सुपुत्र विठ्ठल निवृत्ती ढोले यांचेही मोलाचे योगदान आहे. रेशीम कीटक संगोपन, तुती लागवड आणि दैनंदिन व्यवस्थापनामध्ये ते वडिलांना खांद्याला खांदा लावून सहकार्य करत आहेत. वडील आणि मुलगा यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रेशीम उद्योग अधिक सक्षम आणि यशस्वीपणे विकसित होत असून, अनेक युवकांसाठी हा आदर्श ठरत आहे.निवृत्ती ढोले यांनी स्वतःच्या अनुभवाच्या आधारे इतर शेतकऱ्यांनाही रेशीम शेतीचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रेरणेतून परिसरातील अनेक शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत असून, आदिवासी भागात हा व्यवसाय रोजगाराचे प्रभावी साधन ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या सन्मान सोहळ्याला कृषी अधिकारी महेश नागपुरकर, सह गटविकास अधिकारी हेमंत बच्छाव तसेच गटविकास अधिकारी रवीकांत सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध गावांतील रेशीम उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी निवृत्ती ढोले यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कमी शिक्षण असूनही अथक परिश्रम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर मोठे यश मिळविता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.निवृत्ती बुधा ढोले यांचा झालेला हा शासकीय सन्मान हा केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा गौरव नसून वावी हर्ष गाव, त्र्यंबकेश्वर तालुका आणि संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे भविष्यात रेशीम उद्योगाला अधिक चालना मिळेल आणि अनेक युवक स्वावलंबनाकडे वाटचाल करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
