प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेचे रखडलेले अनुदान, तसेच रोजगार हमी योजनेची थकीत मजुरी तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयावर शेकडो घरकुल लाभार्थ्यांनी चार तास ठिय्या आंदोलन केले. अखेर गटविकास अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुमारे तीन हजार घरकुल लाभार्थ्यांना दुसरा व तिसरा अनुदानाचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अनुदान वेळेत न मिळाल्याने अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यात कुटुंबांसह उघड्यावर राहण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे. याशिवाय मे महिन्यापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या हजारो मजुरांची मजुरीही प्रलंबित असल्याने आर्थिक अडचणी अधिक तीव्र झाल्याचे आंदोलकांनी सांगितले.
एल्गार कष्टकरी संघटनेने यापूर्वीही पंचायत समितीकडे वारंवार निवेदने देऊन घरकुलाचे रखडलेले हप्ते तात्काळ वितरित करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप संघटनेने केला. शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत लाभार्थ्यांना परत पाठवले जात असल्याने संताप वाढल्याचेही आंदोलकांनी नमूद केले.दरम्यान, लाभार्थ्यांनी आपले संसारोपयोगी साहित्य घेऊन पंचायत समिती कार्यालयातच वास्तव्यास येण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने चर्चेसाठी पुढाकार घेतला. सविस्तर चर्चेनंतर गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.आंदोलनात वसंत इरते, सुरेखा मधे, हनुमंत सराई, चंदर बदादे, मधु बांगरे, सोमनाथ बांगरे, नामदेव पारधी यांच्यासह शेकडो घरकुल लाभार्थी आणि एल्गार कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
