विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य देत एपिरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सेवा सहयोग फाउंडेशन (ह्युमॅनिटेरियन्स ग्रुप, पुणे) यांच्या संयुक्त सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाडोशी व खाड्याची वाडी येथे नवीन स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या सेवेत समर्पित करण्यात आले.या उपक्रमामुळे दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध झाली असून, शाळेतील मूलभूत सोयी-सुविधांमध्ये मोलाची भर पडली आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे विशेष महत्त्व असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला एपिरॉक कंपनीतर्फे श्रीमती अमृता बिर्ला (एचआर मॅनेजर) व श्री. हर्षल कोर (ग्लोबल प्रॉडक्ट मॅनेजर) उपस्थित होते. सेवा सहयोगतर्फे श्री. अनिल पाटील यांनी सहभाग नोंदविला. ह्युमॅनिटेरियन्स ग्रुपतर्फे श्री. माधव जोशी, श्रीमती मैथिली गोखले आणि श्री. जयंत ओक उपस्थित होते. तसेच श्री. मुकेश राजळे व श्री. शिवराम नरवटे (कॉन्ट्रॅक्टर) यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.यावेळी आळवंड केंद्राचे केंद्रप्रमुख केवारे यांनी दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानले. शाळेचे मुख्याध्यापक गीते सर, खराडे सर, सोनवणे मॅडम आणि आहरे सर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य भरत गुंड यांचीही प्रमुख उपस्थिती होती.विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी व सुरक्षित शैक्षणिक वातावरणासाठी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.
