एकात्मिक बाल विकास सेवा योजना, त्र्यंबकेश्वर प्रकल्पांतर्गत सामुंडी व टाकेदेवगाव विभागातील अंगणवाड्यांमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दुर्गम आदिवासी वाड्या-पाड्यांवर विठ्ठल नामाचा गजर घुमत असताना चिमुकल्यांनी साकारलेला वारकरी संप्रदायाचा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.पर्यवेक्षिका श्वेता गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांनी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. चिमुकल्यांनी विठ्ठल-रखुमाईचे पूजन करून गावातून पारंपरिक दिंडी काढली.
यावेळी “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.अंगणवाड्यांमध्ये अभंग, भजने, आरती तसेच वारकरी परंपरेची माहिती देणारे उपक्रम घेण्यात आले. अनेक बालकांनी विठ्ठल, रखुमाई आणि वारकरी यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. गावातील महिला, किशोरी मुली, युवा मंडळाचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थांनीही या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमानंतर बालकांना फराळ, लाडू व पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे बालकांना आपल्या संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माची ओळख होत असून त्यांच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळत असल्याचे यावेळी अंगणवाडी सेविकांनी सांगितले.आषाढी एकादशीच्या निमित्ताने दुर्गम भागातील अंगणवाड्यांमध्ये रंगलेला हा भक्तिमय सोहळा बालकांसह ग्रामस्थांसाठीही अविस्मरणीय ठरला.
