नाशिक / दिंडोरी (विशेष प्रतिनिधी):तिल्लोळी (ता. दिंडोरी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात ‘जागतिक आदिवासी दिन’ अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदिवासी संस्कृतीचा गौरव केला.कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा क्रांतीवीर बिरसा मुंडा व जननायक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या प्रशासक तथा सरपंच मनिषाताई भरसट या होत्या. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगन भरसट, उपाध्यक्ष खंडेराव गांगोडे, माजी सरपंच सिताराम पवार, कचरू भरत, देविदास पवार, वाल्मीक गायकवाड, रमेश भरसट, रामदास भरसट, कांतीलाल भुसारे, एकनाथ भरसट, अंगणवाडी सेविका सुनिता चौधरी व शालिनी भरसट, मुख्याध्यापक राहुल सोनवणे, शिक्षिका ज्योती तुंगार, वृषाली दहिवेलकर, कविता पाटील यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी आदिवासी समाजाचा इतिहास, जल-जंगल-जमीन रक्षणासाठी क्रांतीवीरांनी दिलेला लढा आणि निसर्ग संवर्धनातील योगदानावर आपले विचार मांडले व मार्गदर्शन केले.या प्रसंगी बोलताना रामदास भरसट यांनी आदिवासी संस्कृती व परंपरांच्या जतनाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये आणि त्यांना घडवण्यामध्ये मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे असलेले योगदान मोलाचे असल्याचे सांगत त्यांनी शिक्षकांच्या कार्याचा विशेष गौरव केला.तसेच, शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांची ‘नाशिक जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या’ जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी दिगंबर भरसट व यशवंत खिल्लार यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी रावसाहेब मिस्तरी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
