त्र्यंबकेश्वर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील शेतजमिनी साधुग्रामसाठी अधिग्रहित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी या संभाव्य भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवत, “कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जमिनी देणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत, अशी मागणी केली.त्र्यंबकेश्वर हा डोंगराळ आणि आदिवासीबहुल परिसर असून, अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. शेतजमीन ही केवळ मालमत्ता नसून शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तात्पुरत्या व्यवस्थेसाठी सुपीक व कसदार शेतीजमीन अधिग्रहित करणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व व्यवस्था उभारण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या जमिनींचा बळी देण्यास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. साधुग्रामसाठी शक्य असल्यास शासकीय जमीन शोधून त्याचा वापर करावा, असा पर्यायही शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर मांडला आहे.दरम्यान, साधुग्रामसाठी जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेअंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून नोटिसा देण्यात आल्याची माहिती आहे. या नोटिसींवर शेतकऱ्यांना हरकत अर्ज दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. प्रयागतीर्थासमोरील जागेवर नियोजित साधुग्राम उभारण्याच्या दृष्टीने कुंभमेळा प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.या वेळी शिखरे, दातेबंधू सोनवणे, पाटील, कदम, कोठुळे, काळे, वारुणसे, तुंगार, मिंदे, लोणारी, गुळवे, कोठुळे, देवरे, चव्हाण, संजय कडलग, बंधू पुरोहित यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.“कुंभमेळ्यासाठी सुविधा उभाराव्यात; मात्र शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या जमिनी हिरावून घेऊ नयेत,” अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून, प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
