श्रावणातील लाखो भाविकांच्या गर्दीत त्र्यंबकेश्वर नगरी चकाचक!

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: पवित्र श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे दररोज लक्षावधी भाविकांची गर्दी होत असल्याने त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या वतीने संपूर्ण श्रावण महिन्यात विशेष स्वच्छता व्यवस्था राबविण्यात आली. नियमित स्वच्छता व्यवस्थेसोबतच २५ अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विशेषतः शनिवार, रविवार आणि सोमवार या गर्दीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याने नियमित कचरा संकलनाव्यतिरिक्त दररोज अंदाजे ९ ते १३ टन अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आला.नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेला विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. स्वयंसेवकांच्या मदतीने मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, प्रमुख रस्ते, बाजारपेठ, पार्किंग परिसर तसेच भाविकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी विशेष स्वच्छता करण्यात आली.

विशेषतः तिसऱ्या तसेच श्रावणातील सर्वच सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर नियमित स्वच्छता व्यवस्थेबरोबरच अतिरिक्त मनुष्यबळ, स्वयंसेवक आणि विशेष स्वच्छता पथकांच्या माध्यमातून परिसराची स्वच्छता प्रभावीपणे करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा तातडीने संकलित करून परिसर स्वच्छ ठेवण्यावर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने विशेष भर दिला.या संपूर्ण स्वच्छता मोहिमेसाठी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचा आरोग्य विभाग सातत्याने कार्यरत होता. आरोग्य विभागाचे अधिकारीही स्वच्छता व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर वेळोवेळी लक्ष ठेवून आवश्यक त्या सूचना देत होते. त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि आरोग्य सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने श्रावणातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता यंत्रणा प्रभावीपणे राबविली.लाखो भाविकांच्या गर्दीत शहराची स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नगरपरिषद, स्वच्छता कर्मचारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे ‘स्वच्छ त्र्यंबक नगरी’ चा संकल्प प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »