साक्ष न्यूज: महसूल फेरफार नोंदींच्या कामकाजात झालेल्या अनियमिततेची गंभीर दखल घेत इगतपुरी तालुक्यात महसूल विभागावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. इगतपुरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या आदेशाने एका मंडळ अधिकाऱ्यासह पाच तलाठ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, तीन तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर उर्वरित दोन तलाठ्यांसह मंडळ अधिकाऱ्याची प्रत्येकी एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईत सांजेगावच्या तलाठी समीक्षा देव यांच्यावरही कारवाई झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.इगतपुरी तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या दफ्तरांची तपासणी करण्यात आली. प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासणीदरम्यान मुकणे, वाडीवऱ्हे, मुंढेगाव, सांजेगाव आणि गोंदे दुमाला येथील महसूल कामकाजात विविध अनियमितता आढळून आल्या. फेरफार नोंदी करताना संबंधित खातेदार व हितसंबंधित व्यक्तींना आवश्यक नोटीस न बजावता कार्यवाही पूर्ण करणे, अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन फेरफार नोंदी घेणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी न करणे तसेच कागदपत्रांची पूर्तता न करता फेरफार नोंदीची कार्यवाही पूर्ण करणे, अशा गंभीर त्रुटी तपासणीत निदर्शनास आल्या.
सांजेगावच्या तलाठी समीक्षा देव यांच्या कामकाजात आढळलेल्या अनियमिततेचीही प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. महसूल फेरफार नोंदीसारख्या महत्त्वाच्या कामात नियम व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता याकडे दुर्लक्ष झाल्याचे तपासणीत समोर आल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सांजेगाव परिसरात या कारवाईची विशेष चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, वाडीवऱ्हेचे मंडळ अधिकारी बबन कोकाटे यांच्या दफ्तर तपासणीत अधिनस्त तलाठ्यांच्या कामकाजावर आवश्यक नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आले. तसेच ई-ऑफिसद्वारे नामंजूर झालेल्या फेरफार नोंदींमध्ये संबंधित तलाठ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात कसूर झाल्याचेही तपासणीत समोर आले. या पार्श्वभूमीवर मंडळ अधिकारी कोकाटे यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले असून, त्यापैकी एका तलाठ्याविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. तर उर्वरित दोन तलाठ्यांसह मंडळ अधिकाऱ्याची प्रत्येकी एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.कारवाई झालेल्यांमध्ये वाडीवऱ्हेचे मंडळ अधिकारी बबन कोकाटे, वाडीवऱ्हे तलाठी नितीन केदार, गोंदे दुमाला तलाठी सोमनाथ सांगळे, सांजेगाव तलाठी समीक्षा देव, मुंढेगाव तलाठी मनोज वाकदकर आणि मुकणे तलाठी पुष्कराज निकम यांचा समावेश आहे.महसूल फेरफार नोंदींच्या कामकाजातील अनियमिततेवर थेट कारवाई झाल्याने इगतपुरी तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रशासनाचे अधिक काटेकोर लक्ष राहणार असून, तहसील कार्यालयातील दफ्तरांचीही अचानक तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
