इगतपुरी | दि. २ एप्रिल २०२६ : इगतपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे (CDPO) कार्यालय २ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बंद अवस्थेत आढळून आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कार्यालयाच्या दरवाजाला कुलूप लावलेले असल्यामुळे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना व लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, कार्यालयीन वेळेतच कार्यालय बंद असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. बाल विकास प्रकल्प कार्यालय हे अंगणवाडी सेवा, लहान मुलांचे पोषण, आरोग्य व पूर्वशिक्षण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या योजनांचे कामकाज पाहते. अशा परिस्थितीत संबंधित अधिकारी अनुपस्थित राहणे किंवा कार्यालय बंद ठेवणे हे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जर संबंधित अधिकारीच जबाबदारी पार पाडत नसतील, तर अंगणवाडीतील लहान मुलांच्या सेवांचे काय होणार? यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाकडे इगतपुरी पंचायत समितीचे कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाचा तातडीने खुलासा करून जनतेचा विश्वास पुन्हा मिळवणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
