इगतपुरी प्रतिनिधी : विशाल रोकडे
इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठ दिवसांपूर्वीच गावातील काही नागरिकांना रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत वन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली होती.
मात्र, आज पुन्हा एकदा सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास बिबट्या हा रंगनाथ खंडू घायवट यांच्या घराजवळ दिसून आला. बिबट्या दिसताच घायवट यांनी तात्काळ गावात माहिती दिली. यानंतर अनेक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली व प्रत्यक्ष बिबट्याला पाहिल्याची पुष्टी केली आहे.
या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले असून, ग्रामस्थ रात्री बाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे.
