वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीतील कुन्हेगाव येथे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी वाडीचन्हे पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 209/2025 अन्वये बीएनएसएस कलम 325, 271, 3(5), तसेच भारतीय हत्यार कायदा 4/25 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 5(क), 9(ज) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात जागेवर थेट जनावरांची कत्तल करणारा मुख्य आरोपी सुफीयान हुशेन कुरेशी (शेख), वय 23, रा. भिवंडी, जि. ठाणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल दोन महिन्यांपासून फरार होता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग होताच शोधमोहीम अधिक वेगाने सुरु झाली. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे भिवंडी परिसरात आरोपीचा माग शोधला आणि सुफीयान कुरेशी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.ही कार्यवाही नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार,पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली,उपनिरीक्षक हर्षल भोळे,पोलीस हवालदार प्रविण काकड, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम या पथकाने केली.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे त्वरित कारवाईबद्दल कौतुक करत न्यायासाठी उचललेले हे पाऊल योग्य दिशेने असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
